मुंबई (वृत्तसंस्था) एनडीपीएसच्या विशेष न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर आता बॉलिवुड किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खाननं जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव असून नव्याने वकिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानची बाजू मांडणार आहेत.
आर्यन खानला जामीन मिळवून देण्यासाठी सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी हे आज हायकोर्टात युक्तीवाद करणार आहेत. मुकुल रोहतगी आणि त्यांची टीम लंडनहून मुंबईत दाखल झाली आहे. तसंच, या टीमला आर्यनची बाजू मांडणारी टीम कायदेशीर सहकार्य करणार असल्याची माहिती आहे. शिवाय, ज्येष्ठ वकील अमित देसाई आणि सतीश मानेशिंदे हेदेखील सुनावणीला उपस्थित राहणार आहेत.
कोर्डिलिया अमलीपदार्थ प्रकरणात २ ऑक्टोबरला इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनलवरून एनसीबीने आर्यनला ताब्यात घेतल्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी त्याला अटक करण्यात आली होती. मॅजिस्ट्रेट कोर्टाने त्याला आधी एनसीबी कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. न्यायालयीन कोठडी सुनावताच आर्यनतर्फे ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदें यांनी जामिनासाठी अर्ज सादर केला. मात्र, आर्यनविरोधात लावलेली कलमे पाहता या कोर्टाला जामीन अर्जावर सुनावणी घेण्याचा अधिकार नाही, असा आक्षेप एनसीबीतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी नोंदवल्यानंतर त्या कोर्टाने त्या तांत्रिक मुद्द्यावर अर्ज फेटाळला. त्यानंतर आर्यनतर्फे सेशन्स कोर्टातील विशेष एनडीपीएस कोर्टासमोर अर्ज करण्यात आला. त्यात आर्यनतर्फे मुंबईतील सुप्रसिद्ध ज्येष्ठ फौजदारी वकील अमित देसाई यांनी युक्तिवाद मांडला. मात्र, तो अर्ज विशेष न्यायाधीश वैभव पाटील यांनी सुनावणीअंती २० ऑक्टोबरला फेटाळला. त्याचदिवशी सतीश मानेशिंदे यांनी आर्यनतर्फे मुंबई हायकोर्टात जामीन अर्ज दाखल केला. मात्र, न्या. नितीन सांब्रे यांनी २६ ऑक्टोबरला (आज) सुनावणी घेऊ, असे सांगितले.