मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह आणि अटकेत असलेला माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची तासभर भेट झाली होती. या भेटीची चौकशी करण्यात येणार असून तसे आदेश दिल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. तसेच परमबीर सिंह ज्या गाडीचा वापर करत आहेत ते चुकीचं आहे, याप्रकरणीही चौकशी करण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले.
एखाद्या प्रकरणातील आरोपी आहे, आणि तो न्यायालयीन कोठडीत आहे अशा आरोपींना एकमेकांना भेटता येत नाही, असे असताना परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांची भेट कशी झाली याची चौकशी केली जाईल, असे गृहमंत्री वळसे पाटील यांनी म्हटले आहे. या प्रकरणातील आरोपी बाहेर अशा प्रकारे कुणाशीही चर्चा करू शकत नाहीत, असेही ते म्हणाले.
शिवाय परमबीर सिंह यांनी सरकारी गाडीचा वापर करणेही गैर असल्याचे वळसे पाटील म्हणाले. परमबीर सिंह यांनी अद्याप पदभार घेतलेला नसून त्यांच्या निलंबनाबाबतही कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यावर निर्णय होण्यापूर्वीच अशा प्रकारे भेटीगाठी करणे अयोग्य असल्याचे गृहमंत्री म्हणाले.