धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील रेल येथे एका ७० वर्षीय वृद्ध महिलेला मारहाण करत कान कापून कानातील ८ ते १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे किल्लू आणि रोकड चोरून नेल्याची घटना घडली होती. चोरट्याने गावठी दारू पेत पोथरी घटनास्थळी फेकली होती. हाच धागा पकडत पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
या संदर्भात अधिक असे की, २९ डिसेंबर रोजी रात्री (वेळ निश्चित माहित नाही) विमलबाई श्रीराम पाटील (वय ७०, रा. रेल ता. धरणगाव ) ह्या घराच्या वरील पत्री शेडमध्ये एकटी झोपलेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या कानातील ८ ते १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे किल्लु कान कापून तसेच डोक्यावर व तोंडावर दुखापत करुन चोरुन नेले होते. घटनास्थळी स्थानिक पोलिसांसह सर्व मोठे अधिकारी पोहचले होते. स्थानिक गुन्हे शाखेने देखील तपासाला सुरुवात केली असून घटनास्थळी गावठी दारू पोथरी आढळून आल्यामुळे चोरटा स्थानिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच गावठी दारू विक्रेत्यांनाही रडारवर घेत त्यांच्याकडून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न सुरु आहे. चोरीचा लवकरच उलगडा होईल, असा आशावाद स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांनी व्यक्त केला आहे.