मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या चिंता वाढवणारी आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारही आतापर्यंत कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. अशात आता कोरोना काळात गरजूंना मदत करणारा रिअल सुपरहिरो सोनू सूद यालाही कोरोनाची लागण झाली आहे. सोनू सूदने ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे.
सोनू सूदने काय म्हटलंय ट्विटमध्ये? नमस्कार, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यानंतर मी स्वत: क्वारंटाईन झालो आहे. चिंतेचे कोणतेही कारण नाही. उलट आता माझ्याकडे तुमच्या समस्या सोडवण्यासाठी पहिल्यापेक्षा जास्त वेळ आहे. लक्षात ठेवा, कोणतीही समस्या असली, तरी मी तुमच्यासोबत सदैव आहे, असे ट्वीट सोनू सूद याने केले आले. बॉलिवूडमध्ये खलनायकाच्या भूमिकेत लोकप्रिय असलेला अभिनेता खऱ्या आयुष्यात मात्र नायक ठरला आहे. २०२० साली संपूर्ण देशभरात कोरोना महामारीच्या काळात स्थलांतरीत मजुरांच्या मदतीला सोनू सूद धावून आला. स्थलांतरितांना सोनू सूदने आपापल्या घरी सुखरूप पोहोचवलं. अनेकांना रोजगार मिळवून देखील दिला.