बोदवड प्रतिनिधी । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन लावण्यात आले असून या काळात आत्मसन्मान फाऊंडेशन तर्फे गरीब लोकांना किराणा किट देण्याचा उपक्रम राबवला जात असतांनाच एका ६२ वर्षी वृध्द महिलेस दृष्टी नसल्याचे लक्षात आले. तात्काळ संबंधित महिलेच्या डोळ्यांवर उपचार केल्यामुळे महिलेस पुन्हा दृष्टी मिळाली आहे. सामाजिक संस्थेने केलेल्या प्रयत्नाचा सर्वत्र कौतुक केले जात आहे.
आत्मसन्मान फाऊंडेशनचे समाधान पाटील यांना इंदूबाई पवार (वय -६२) महिलेस लहान मुलांच्या मदतीने घरोघरी जेवण मागत असतांना आढळली. या महिलेस दिसत नव्हते तसेच लॉकडाऊनमुळे तिचा हातमजुरी करणारा मुलगा सुद्धा घरीच होता. या कुटुंबास आत्मसन्मान तर्फे दैनंदिन गरजेचे धान्य, किराणा देण्यात आले. त्यानंतर या महिलेच्या डोळ्यांची तपासणी नांदुरा येथील तिरुपती देवस्थान संचलित मोहनराव नारायणा नेत्रालायाचे बोदवड येथील दृष्टी नेत्र तपासणी केंद्रात करण्यात आली असता तिच्या दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू असल्याचे निदर्शनास आले आणि त्यामुळे तिला दिसत नसल्याचे निष्पन्न झाले. या संस्थेने या महिलेचे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून देण्याचे ठरवले काही दिवस वैद्यकीय सल्ल्यानुसार तिला प्राथमिक औषधे देण्यात आली. नुकतीच या महिलेच्या एका डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया नांदुरा येथे पार पडली. शस्त्रक्रियेनंतर दिसू लागल्याने ही महिला खूप आनंदित झाली तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहता तिरुपती संस्थानचे अध्यक्ष मोहनराव यांनी आपल्या संस्थेच्या कामाचे सार्थक झाले. अश्या भावना व्यक्त केल्या तसेच अश्या गरजू लोकांना मदतीस लोकांनी पुढे येऊन संपर्क करावा, संस्था आपल्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करेल असे आवाहन केले. तसेच काही दिवसात या महिलेच्या दुसऱ्याही डोळ्याचीही शस्त्रक्रिया करून देण्यात येईल, असे सांगितले. तसेच या महिलेस मदत केल्याबद्दल आत्मसन्मान फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.