नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणी पुढे ढकळण्यात आली आहे. यामुळे राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील सरकारवर टीका केलीं आहे. मराठा समाजाच्या उद्रेकाचा बांध फुटायची वेळ आता आली आहे. या उद्रेकाची सरकार वाट पाहतेय की काय? असा सवाल उदयनराजे यांनी उपस्थित केला आहे.
मराठा आरक्षणावरील स्थगितीसाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान, महाराष्ट्र सरकारचा वकील उपस्थित नसल्याने न्यायालयाने ही सुनावणी काही काळासाठी तहकूब केली होती. त्यानंतर पुन्हा सुनावणी झाल्यावर, कोर्टाने ही सुनावणी ४ आठवडे पुढे ढकलली आहे. मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणी पुढे ढकलल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे की, जर मराठा आरक्षणाबाबत सरकार कोणतीही ठोस पावले उचलले नाही तर खंबीर मराठा समाज आता सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर आज पहिल्यांदाच सुनावणी पार पडणार होती. मात्र सरकारी वकील उपस्थित नसल्याने काही काळ कामकाज तहकूब करण्यात आले. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर नाही ही बाब स्पष्टपणे दिसून आली आहे. तसेच सरकार आणि वकिलांमध्ये कसलाही समन्वय नाही, असं देखील सिद्ध होत आहे. त्यामुळे मराठा आरक्षण प्रश्नाबाबत सरकारची भूमिका आता संशयास्पद आहे. आता तरी सरकारने तातडीने ठोस पाऊले उचलावीत, असेही उदयनराजे यांनी म्हटले आहे.