नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने एक कोटींचा टप्पा पार केलेला आहे. देशात एका महिन्यात जवळपास १० लाख जणांना कोरोनाची लागण झाल्याने, देशातील करोनाबाधितांच्या संख्येने शनिवारी एक कोटीचा टप्पा ओलांडला.
कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण कमी झाले असून ९५.५० लाख जण कोरोनातून बरे झाले आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात १९ डिसेंबरपर्यंत १६,११,९८,१९५ नमुन्यांची तपासणी झाली आहे. यापैकी ११ लाख ७ हजार ६८१ नमूने काल(शनिवार) तपासण्यात आले असल्याचे आयसीएमआरच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे. मागील २४ तासांमध्ये देशभरात २६ हजार ६२४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर ३४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, याच कालावधीत देशात २९ हजार ६९० जण कोरोनामुक्त देखील झाले आहेत. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता १ कोटी ३१ हजार २२३ वर पोहचली आहे. सद्यस्थितीस देशात ३ लाख ५ हजार ३४४ अॅक्टिव्ह केसेस असून, ९५ लाख ८० हजार ४०२ जण कोरोनामुक्त झालेले आहेत. याशिवाय आतापर्यंत देशभरात १ लाख ४५ हजार ४७७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झालेला आहे. आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, सह आजार असलेले लोक तसेच पन्नाशीवरील नागरिक अशा लक्ष्य समूहातील तीस कोटी लोकांचे कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण तातडीने करण्याची गरज आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी शनिवारी व्यक्त केली.