धुळे (प्रतिनिधी) समाजातील लोकांकडून मदत मिळवून देण्याचे अमिष दाखवून महिलेकडील दागिन्यांची पिशवी एकाने लंपास केल्याची घटना देवपूर भागातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेजवळ घडली आहे. याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवपूर भागातील पांचाळवाडा परिसरातील हुसेनिया नगरातील रहिवासी नुरबानो युनुिसा शाह (६०) ही महिला दि.२५ रोजी सकाळी ११ ते १२ वाजेच्या दरम्यान देवपूरातील पंचवटी येथे बँक ऑफ महाराष्ट्र शाखे समोरून जात असताना एक अनोळखर ३० ते ३५ वयोगटातील तरुण त्यांच्याजवळ आला. त्याने महिलेला समाजातील लोकांकडून मदत मिळवून देण्याचे अमिष दाखवून विश्वास संपादित केला. त्यांच्याकडील दागिन्यांची पिशवी लंपास केली. या पिशवीत २१ हजार रुपये किंमतीचे सात ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, १९ हजार रुपये किंमतीचे ६.५ गॅम वजनाचे दुसरे मंगळसूत्र, १५ हजार रुपये किंमतीचे व पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले असा एकूण ५५ हजार रुपयांचा लंपास करून फसवणूक केली. याप्रकरणी नुरबानो शाह यांनी देवपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.