जळगाव (प्रतिनिधी) व्हिडिओला लाईक व शेअर करण्यासाठी मोबदला देण्याचे अमिष दाखवत राहुल भागवत सोनवणे (वय ३१, रा. बांभोरी, ता. धरणगाव) या तरुणाची ११ लाख ४३ हजार ९९९ रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. ३१ मे ते ५ जून या सहाच दिवसात राहुलसह त्याच्या वडिलांच्या बँक खात्यातून रक्कम काढून घेण्यात आली. या प्रकरणी गुरुवार ६ जून रोजी दुपारी ४ वाजता सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील रहिवासी असलेला राहुल सोनवणे हा शिक्षण घेत आहे. ३१ मे ते ५ जून या दरम्यान मोबाईलवरून व टेलिग्रामवरून त्याच्याशी एका जणाने संपर्क साधला. यात त्याला ऑनलाईन टास्क देत व्हिडिओ लाईक व शेअर केल्यास एका व्हिडिओसाठी १२३ रुपये देण्याचे अमिष दाखवले. या सोबतच वेगवेगळे टास्क देऊन अधिक पैसे गुंतवल्यास जास्त प्रमाणात नफा होईल, असे आश्वासन दिले. त्यानुसार गुंतवणूक केली मात्र नफा तर दूरच, मुद्दलही गेल्याने आपली फसवणूक झाल्याचे तरुणाच्या लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर राहूल सोनवणे याने गुरूवार ६ जून रोजी दुपारी ४ वाजता जळगाव येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहेत.