धरणगाव (प्रतिनिधी) एरंडोल तालुक्यातील टाकरखेडा शिवारातील जैन कंपनीत टी.सि.पी.कलचर विभागातील केबल, पॉली बंडल चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी धरणगाव पाळधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रिक्षा चालकासहित अन्य एकाला अटक करण्यात आली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, जैन कंपनीत टी.सि.पी.कलचर विभागात मनोहर काशिनाथ बाविस्कर हे ड्युटीवर पेट्रोलिंग करीत असतानां रिक्षा क्र एम.एच. १९ व्ही ५८२० वरील चालक शफी मन्यार (रा. शिरसोली) व त्याच्यासोबत असलेला अज्ञात इसम यांनी १५,००० रुपये किंमतीची सेंसर केबल, १५,००० रुपये किंमतीची केबल, १,००० रुपये किंमतीचे पॉली बंडल, असा एकूण ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल आदिल शफि मन्यार चालवित असलेल्या रिक्षा क्र.एम.एच.१९ व्ही. ५८२० मध्ये टाकुन चोरुन नेला. याप्रकरणी जैन कंपनीमध्ये टाईम ऑफिसर मनोहर काशिनाथ बाविस्कर (वय ३५ रा. टाकरखेडा ता. एरंडोल) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पाळधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपस पो.ना उमेश रमेश भालेराव करीत आहे.