जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील देवपिंप्री येथील भर चौकातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या स्वस्त धान्य दुकानात चक्क जुगाराअड्डा चालतो, या प्रकाराने गावातील वातावरण दुषीत होऊ शकते, विशेष म्हणजे जुगार शौकीन नागरीक खेळण्यासाठी दुरवरून येथे येत असल्याचेही सांगण्यात येते. संबंधीत स्वस्त धान्य दुकान हे एका पुढार्याच्या पत्नीच्या नावे असल्याचे समजते. या प्रकाराकडे गार्ंभीयाने लक्ष घालावे यासाठी राष्ट्रवादीने तहसिलदार यांच्याकडे निवेदन दिले आहे.
जामनेर शहरातील एका रास्तभाव दुकानामध्ये प्रत्येक महिन्यात दोन-तीन दिवसात धान्यवाटप करण्यात येते. त्यानंतर त्या ठिकाणी जुगार अड्डा बसलेला दिसून येतो. दुसरे म्हणजे या देवपिंप्रीतील स्वस्त धान्य दुकानातील जुगार सुरू असल्याची चक्क व्हिडीओ क्लीप तालुक्यात फिरू लागल्याने त्या पुढार्याची चांगलीच पंचाईत झाल्याचे समजते. या प्रकाराबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष संदीप हिवाळे यांनी निवेदन राष्ट्रवादी कॉंग्रेस मार्फत पुरवठा अधिकारी व तहसिलदार अरूण शेवाळे यांचेकडे दिले.
त्यात संबंधीत स्वस्त धान्य दुकानातील जुगार अड्डा बंदकरून परवाना रद्द करण्याची मागणी करण्यात आली. स्वस्त धान्य दुकानावर प्रशासनाकडुन कायदेशीर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असेही निवेदनात नमुद करण्यात आले आहे. निवेदनाच्या प्रती राज्याचे अन्न-पुरवठा मंत्री, जिल्हाधीकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी आदींना पाठविण्यात आल्या आहेत. यावेळी राष्ट्रवादी सामाजीक न्याय सेलचे तालुकाध्यक्ष संदिप हिवाळे, पक्षाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील, शहराध्यक्ष जितेश पाटील, तालुका उपाध्यक्ष प्रल्हाद बोरसे, ज्ञानेश्वर पाटील, सागर कुमावत आदिंसह पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.