अमळनेर (प्रतिनिधी) ज्यांच्यात प्रचंड अपयश पचवण्याची धमक असते तेच भव्यदिव्य यश संपादन करतात व यशाला कधी शॉर्टकट नसतो, असे अमळनेर येथे सत्कार समारंभ कार्यक्रमात देवगांव देवळी येथील शरद खैरनार यांची भारतीय संरक्षण मंत्रालयात प्रतिकूल परिस्थितीवर मात करत लिपिक पदावर निवड झाल्याबद्दल सत्कार प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष अमळनेर मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील बोलत होते.
व्यासपीठावर सत्कारार्थी शरद खैरनार, ओबीसी असोसिएशनचे सल्लागार दशरथ लांडगे, देवगांव देवळी हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल महाजन, जुनी पेन्शन संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष प्रभुदास पाटील, जिल्हा कार्यकारिणी सदस्य एन.आर चौधरी, प्रभाकर विंचुरकर,हिंदी अध्यापक मंडळाचे तालुकाध्यक्ष आशिष शिंदे,ओबीसी असोसिएशनचे तालुकाध्यक्ष सोपान भवरे, भरवस हायस्कूलचे क्रीडाशिक्षक आर आर सोनवणे, अमळनेर तालुका क्रीडा संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील वाघ, समता शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष अजय भामरे, ओबीसी शिक्षक असोसिएशनचे सहसचिव अश्विन पाटील, भूपेंद्र शिरसाठ होते. कार्यक्रमाची आयोजक ओबीसी शिक्षक असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन यांनी प्रस्ताविक केले. विविध यश संपादन करणाऱ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
ओबीसी शिक्षक असोसिएशनच्या वतीने दरवर्षाला विशेष गुण संपादन करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली जाते. अशाच एका प्रतिकूल परिस्थितीत ज्याने आपलं यश संपादन केलं अशा ग्रामीण भागातील देवळी सारख्या गावात वडिलांचे छत्र विद्यार्थी दशेतच हरवल्यानंतर परिस्थितीशी दोन हात करून भारतीय संरक्षण मंत्रालयात लिपिक पदावर मजल मारली हे भूषणावह आहे.. त्यामुळे त्याचा सत्कार करणे ओबीसी असोसिएशनच्या पदाधिकारी यांनी ठरवले आणि त्याचा जंगी सत्कार विद्याविहार कॉलनीमध्ये करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष व सर्व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते शाल, बुके, सानेगुरुजींचे पुस्तक, पेन देऊन त्याला शुभेच्छा देण्यात आला.
सत्काराला उत्तर देतांना शरद खैरनार म्हणाले की, आपले ध्येय साध्य करत असतांना अनेक जण चुकीचा सल्ला देऊन आपल्याला यापासून प्रावृत करण्याचा प्रयत्न करीत असतात पण आपण सावध राहून योग्य व अयोग्य कोण हे वेळीच समजून आपण योग्य मार्गावर चालत राहिलो तर नक्कीच यशस्वी होतो, अपयशामागून अपयशाचा सामना करत तेवढ्याच उत्साहाने सतत वाटचाल करत राहणे हा यश प्राप्तीचा मार्ग आहे असे सांगत माझा ओबीसी असोसिएशनने व माझ्या गुरुजनांनी सत्कार केला मी नेहमीच आपल्या ऋणात राहील व भविष्यात मी निश्चितच माझ्या हातून चांगलं काम करून तळागाळातील मुलांचा मार्गदर्शक बनेल, मला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व क्षेत्रातील मान्यवरांचं मी मनापासून आभार न मानता मी ऋणात राहील असे आपल्या मनोगतातून आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओबीसी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष सोपान भवरे यांनी मानले.