जळगाव (प्रतिनिधी) – कुटुंबीय बाहेरगावी गेलेले असताना चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील सोने-चांदीच्या दागिन्यांसह देवीच्या मूर्ती चोरुन नेल्या. ही घटना दि. ४ एप्रिल रोजी उघडकीस आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन शाकीर शेख उर्फ बंदर ताजुद्दीन (२३, रा. कासमवाडी) या संशयित चोरट्याला अटक करण्यात आली आहे.
शहरातील कासमवाडी परिसरातील वंदना आटाळे या दि. २५ मार्च रोजी कुटुंबियांसह बाहेरगावी गेल्या होत्या. त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून सोन्याची अर्धा ग्रॅमची फुली, चांदीची वीट, चांदीच्या दोन मूर्ती, चांदीची चंद्रकोर, तांब्याचे भांडे असा एकूण ५७हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेचे दीर प्रमोद
आटाळे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच चोरटे जेरबंद
गुन्हा दाखल झाल्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे तपासाधिकारी रामकृष्ण पाटील यांनी शाकीर शेख याला अटक केले. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

















