चाळीसगाव (प्रतिनिधी) पोस्ट कार्यालयातून ग्राहकासाठी काढलेली ५० हजार रुपयांची रक्कम पोस्ट एजंटच्या बँगेतून अज्ञात चोरट्ने चोरुन नेली. ही घटना मंगळवारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव पोस्ट कार्यालयाचे एजंट पुरूषोत्तम श्रीधर वाणी (वय ७४) यांनी त्यांच्या नावाच्या चेकद्वारे ग्राहकाची ५० हजार रुपयांची रक्कम
काढली. ही रक्कम बॅगेत ठेवून ते दुचाकीवरून स्टेशन रोड परिसरातील ग्राहकाकडे देण्यासाठी जात असताना ही घटना घडली. ग्राहकाकडे पोहोचल्यानंतर बॅग तपासली असता त्यामध्ये ठेवलेली रक्कम आढळून आली नाही. अधिक तपासणी केली असता बॅगेला तीक्ष्ण हत्याराने कट मारल्याचे लक्षात आले. अज्ञात भामट्याने ही संधी साधून रक्कम चोरून नेल्याचा संशय आहे. या प्रकरणी वाणी यांनी शहर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.















