अमरावती (वृत्तसंस्था) पत्नीचे परिसरातच राहणाऱ्या एका तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय पतीला होता. ते उघड करण्यासाठी त्याने रात्री झोपण्याचे नाटक केले. त्यानंतर त्याने पत्नीचा माग घेतला आणि तिच्या अनैतिक संबंधाचा उलगडा केला. ही घटना रविवार, १३ ऑगस्ट रोजी धामणगाव रेल्वेच्या तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.
परिसरातीलच तरुणासोबत सोशल मिडीयावर चॅटिंग !
या प्रकरणातील तक्रारकर्त्याची २८ वर्षीय पत्नी ही नेहमी इन्स्टाग्राम व व्हॉट्स अॅपवर परिसरातीलच रहिवासी एका २० वर्षीय तरुणासोबत चॅटिंग करीत होती. त्यामुळे पत्नीचे सदर तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय पतीला होता. या प्रकाराने वैतागून पतीने गेल्या महिन्यातच पत्नीला समजावून सांगितले.
मोबाइलचा जास्त वापर करू नको पत्नीला बजावले होते !
मोबाइलचा जास्त वापर करू नको, असे त्याने पत्नीला बजावले होते. पण, तरीही ती ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. त्यामुळे त्याने पत्नीला रंगेहाथ पकडून तिच्या अनैतिक संबंधाचे बिंग फोडण्याचा निर्धार केला. दरम्यान, रविवारी रात्री त्याला पत्नी पुन्हा मोबाइलवर चॅटिंग करताना दिसून आली. त्याचवेळी पत्नी कुणाला तरी भेटायला जाऊ शकते, असा संशय पतीला आला. त्यामुळे त्याने झोपण्याचे नाटक केले. पती झोपल्याचे पाहून पत्नी हळूच घराबाहेर पडली.
तरुणाच्या बाहुपाशात रंगेहात पकडले !
घराच्या दरवाजाची बाहेरची कडीही तिने लावून घेतली. त्यामुळे पतीचा संशय आणखी बळावला. त्याने तातडीने ताराच्या साहाय्याने दाराची कडी उघडली आणि दुसऱ्या खोलीत जाऊन बघितले. त्यावेळी त्याला त्याची पत्नी परिसरातील रहिवासी सदर तरुणाच्या बाहुपाशात आढळून आली. आपले बिंग फुटल्याचे पाहून पत्नी हादरली. तर हा धक्कादायक प्रकार बघून पती जाम संतापला. त्याने पत्नीच्या प्रियकराला पकडले. यावेळी त्यांच्यात झटापट झाली. या झटापटीत पत्नीच्या प्रियकराने तेथून पळ काढला. या प्रकरणी पतीच्या तक्रारीवरून पत्नीच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतचे वृत्त आज एका दैनिकाने प्रसिद्ध केले आहे.