धरणगाव (प्रतिनिधी) बोरगाव खुर्द आणि बोरगाव बुद्रुक या गावांसाठी अंजनी नदीवरून ३ कोटी रूपयांच्या पाणी पुरठा योजनेला मंजुरी मिळाली असून लवकरच याच्या कामास प्रारंभ होणार असल्याची घोषणा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केली. यामुळे दोन्ही गावांमधील पिण्याच्या पाण्याची समस्या कायम मिटली असल्याचे ते म्हणाले.
बोरगाव ते धरणगाव तसेच बोरगाव ते टोळी या रस्त्यांची कामे लवकरच मार्गी लागणार असून गावातील तरूणांसाठी व्यायामशाळा बांधकाम आणि मारोती मंदिरालगत २० लाखांचे सभामंडप मंजूर करण्यात असल्याचे पालकंमत्र्यांनी याप्रसंगी जाहीर केले. यावेळी अंजनी कालव्यावरील जलसेतूचे लोकार्पण देखील पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले असून यामुळे ५७६ हेक्टर जमीन ओलीताखाली येणार आहे. याचा बोरगाव खुर्द, बोरगाव बुद्रुक, टोळी, बोरगाव, पाळधी आणि बांभोरी खुर्द शिवारातील शेतकर्यांना लाभ होणार असून या भागाचा कायापालट होणार असल्याचे प्रतिपादन देखील पालकमंत्र्यांनी केले. याच कार्यक्रमात पेव्हींग ब्लॉक, जलशुध्दीकरण फिल्टर आणि कॉक्रिटीकरणाच्या कामांचे लोकार्पण देखील केले.
यांची होती प्रमुख उपस्थिती
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते बोरगाव खुर्द आणि बोरगाव बुद्रुक या दोन्ही गावांमध्ये विविध विकासकामांचे भूमिपुजन आणि लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जि.प. सदस्य प्रतापराव पाटील, महिला आघाडी तालुका प्रमुख जनाबाई पाटील, बोरगाव बुद्रुकचे सरपंच लक्ष्मण मोरे, खुर्दचे सरपंच आबा पाटील, उपसरपंच नितीन पाटील, विकासो चेअरमन मालू बिर्ला, व्हाईस चेअरमन माधव पाटील व संचालक उपसभापती प्रेमराज पाटील, माजी सभापती अनिल पाटील पं.स सदस्य मुकुंदराव नन्नवरे, प्रमोद पाटील, ग्रामपंचायत सदस्य महेश मराठे, किशोर मराठे, ज्ञानेश्वर मराठे, बापू पवार, किशोर शेडगे, गोकुळ पाटील, अंजनी मध्यम प्रकल्पाचे उपअभियंता बनसोड, शाखा अभियंता रवींद्र चौधरी, ठेकेदार पुंडलिकराव कांजे, माधव पाटील, निंबा कंखरे, पिंटू पाटील, पप्पू पाटील, गोविंद पाटील, संभाजी पाटील आदींची उपस्थिती होती.
प्रास्ताविक भगवान महाजन यांनी केले. त्यांनी पालकमंत्र्यांच्या सहकार्याने दोन्ही गावांमध्ये विकासाचे नवीन पर्व सुरू झाल्याचे नमूद करत या कामांची माहिती दिली. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ आणि जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे जळगाव ग्रामीण विधासभा मतदारसंघात विकासाचे एक नवीन पर्व सुरू झाले असल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
या कामांचे लोकार्पण व भूमिपुजन
या कार्यक्रमात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे बोरगाव येथील नागीण नदीवरील जलसेतूचे म्हणजेच कालव्याच्या पुलाचे लोकार्पण करण्यात आले. २ कोटी ३१ लक्ष निधी. तसेच गाव अंतर्गत नवीन प्लॉट एरियात पेव्हींग ब्लॉक-६ लक्ष; वॉटर फिल्टर-५ लक्ष, कॉंक्रिटीकरण आणि गटारीसाठी ३ लक्ष अशा १४ लक्ष कामांचे भूमीपुजन करण्यात आले.
हे प्रश्न लागणार मार्गी
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी राज्यमंत्री व आमदार असतांना गावातील ९० टक्के कामे पूर्ण केली आहेत. बोरगाव ते धरणगाव या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी १ कोटी निधी मंजूर केला असून लवकरच कामाला सुरूवात होणार आहे. तसेच बोरगाव ते टोळी हा ३ किलोमीटरचा रस्ता मंजूर करून मार्गी लावणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. गावातील तरूणांसाठी व्यायामशाळा बांधकाम आणि मारोती मंदिरालगत २० लाखांचे सभामंडप मंजूर करण्यात येणार असल्याचे पालकंमत्र्यांनी घोषीत केल्याने दोन्ही गावांमधील प्रश्न मार्गी लागणार आहेत.
शेतकरी, विकासो व ग्रामपंचायतीतर्फे हृद्य सत्कार !
ना. गुलाबराव पाटील यांनी अंजनी धरणावरून बोरगावसह परिसरात १० किलोमीटरचा कालवा मंजूर केला होता. यामुळे बोरगाव खुर्द व बुद्रुक तसेच टोळी, बोरगाव, बांभोरी बुद्रुक येथील शेतकर्यांना लाभ होणार होता. यामुळे तब्बल ५७६ हेक्टर जमीन ओलीताखाली येणार होती. मात्र कालवा पूर्ण झाला असला तरी जलसेतूच्या अभावामुळे फक्त ६ किलोमीटरपर्यंतच कालव्यातून पाणी जात होते. शेतकर्यांची ही समस्या लक्षात घेऊन पालकमंत्र्यांनी २ कोटी ३१ लक्ष निधी मंजूर करून जलसेतूचे काम तातडीने पूर्ण केले. यामुळे आता पूर्णच्या पूर्ण म्हणजे १० किलोमीटरपर्यंत कालव्यातून शेतकर्यांना पाणी मिळणार आहे. याचा परिसरातील शेतकर्यांना लाभ होणार आहे. यातच सुदैवाने अंजनी धरण पूर्ण भरल्याने आवर्तन मिळणार असल्यामुळे या कालव्याच्या माध्यमातून परिसराचा कायापालट होणार आहे. पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने शेकडो शेतकर्यांना लाभ होणार असल्यामुळे परिसरातील शेतकरी, ग्रामपंचायत आणि विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून ना. गुलाबराव पाटील यांचा याप्रसंगी हृद्य सत्कार करण्यात आला.
ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न
या सत्काराला उत्तर देतांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील भारावून गेले. ते म्हणाले की, बोरगावसह परिसरातील सर्व गावांनी माझ्यावर नेहमीच भरभरून प्रेम केले आहे. याच प्रेमाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी परिसरातील सर्व विकासकामांना तातडीने गती देण्यात येत आहे. दोन्ही गावांसाठीच्या पाणी पुरवठा योजनेमुळे येथील पाणी टंचाई कायमस्वरूपी मिटणार आहे. तर आपण स्वत: शेतकरी पुत्र असल्याने शेतकर्यांची समस्या लक्षात घेऊन आता कालव्याचे पाणी थेट आपल्या बांधापर्यंत पोहचणार आहे. सध्या काही जण सीझनेबल पुढारी बनले असून त्यांच्यापासून जनतेने सावध राहण्याचा इशारा देखील त्यांनी दिला. तर, बोरगाव खुर्द आणि बोरगाव बुद्रुकसह परिसरातील गावातील जनतेच्या कामांसाठी आपण अहोरात्र प्रयत्नशील असल्याची ग्वाही देखील दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन भैय्या मराठे सर यांनी केले. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य, विकासो सदस्य आदींसह परिसरातील आबालवृध्द मोठ्या संख्येने उपस्थित होते.