जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील जळगाव खुर्द गावाच्या पुलाजवळ रात्री सुमारास धक्कादायक घटना घडली आहे. एका अज्ञात वाहनाने लोखंडी पट्टीवर झोपलेल्या तीन परप्रांतीय तरुणांना उडवल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद गावाच्या पुढे जळगाव खुर्द गावाजवळ असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या नजीक रोडच्या कामाचा सुरुवात करण्यात आलेली आहे. याठिकाणी परप्रांतीय मजूर काम करत असतात. मंगळवारी, 11 मार्च रोजी मध्यरात्री, अंधारामुळे काही दिसत नसताना, अज्ञात वाहनाने या मजुरांना चिरडले. या दुर्घटनेमुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी 7 वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.