यवतमाळ (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील माळीपुरा नगरात शेतीच्या वादातून दोन सख्या भावांमध्ये जोरदार भांडण झाले. यात लहान भावाने मोठ्या भावाच्या पोटावर चाकुने सपासप वार केले. या घटनेत मोठ्या भावाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. राहूल बाचलकर असं मृत्युमुखी पडलेल्या मोठ्या भावाचं नाव असून सतीश बाचलकर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहूल आणि सतीश हे दोन्ही सख्खे भाऊ आहेत. काही कारणास्तव त्यांनी वेगवेगळे राहण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून शेतीची वाटणी करण्यावरून त्यांचा वाद सुरू होता. मंगळवारी दोन्ही भावांमध्ये पुन्हा बाचाबाची झाली. दरम्यान, दोघांमध्ये सुरू असलेला वाद इतका विकोपाला गेला की, लहान भाऊ सतीश याने रागाच्या भरात मोठा भाऊ राहूल याच्या पोटावर चाकूने सपासप वार केले. या थरारक घटनेत राहूल याचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपी पसार झाला होता. मात्र पोलिसांनी त्याचा शोध घेत जेरबंद केले. शेतीची वाटणी करण्यावरून लहान भावानेच मोठ्या भावाची हत्या केल्याने माळीपुरा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.