पुणे (वृत्तसंस्था) राज्यात पुढील ५ दिवसांमध्ये तीव्र हवामान सक्रिय राहणार आहे, असा इशारा भारतीय हवामान (Weather) खात्याने दिला आहे. तर पुणे (Pune) जिल्ह्यात आज पावसाची (Rain) शक्यता वर्तविण्यात आली आहे. या काळात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या (Marathwada) भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे.
याचवेळी मध्य महाराष्ट्रामध्ये सोमवारपासून उष्णतेच्या लाटेचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिण कोकणच्या किनारपट्टीवर, अरबी समुद्रावर मध्यम प्रकारचे ढग होते. सकाळी मुंबई, ठाणे, पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही भाग अंशतः ढगाळलेले होते. येत्या पाच दिवसांत राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रा लगतच्या मराठवाड्याच्या भागांत गडगडाटासह वादळी वारे, पावसाची शक्यता आहे.
‘या’ जिल्ह्यांत पावसाची शक्यता
रायगड, पुणे जिल्ह्यामध्ये सोमवारी, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस, सातारा, सांगली, सोलापूर, जळगाव, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सोमवार ते गुरुवार, कोल्हापूरमध्ये बुधवारपर्यंत, नांदेडमध्ये बुधवार आणि गुरुवारी तर बीड-परभणीमध्ये गुरुवारी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. या काळात वाऱ्यांचा वेगही अधिक असू शकेल. अकोला, बुलडाणा येथे मंगळवार ते गुरुवार तर यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये बुधवारी आणि गुरुवारी तुरळक ठिकाणी ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा तडाखा जाणवू शकतो.