जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा व इतर यंत्रणांच्या प्रयत्नातून जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे. सद्य: स्थितीत उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये घट होतांना दिसत आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ५६ हजार ६५९ रुग्णांपैकी ५४ हजार ८१२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
सद्यस्थितीत ५०२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात १ हजार ३४५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.७४ आहे, तर मृत्युदर २.३७ टक्के इतका आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे. जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत तपासणीसाठी लॅबमध्ये ४ लाख १० हजार २३५ अहवाल पाठविण्यात आले असून त्यापैकी ५६ हजार ६५९ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर २९ अहवाल प्रलंबित आहेत. तसेच जिल्ह्यात ३५४ व्यक्ति होम क्वारंटाईन असून १६५ व्यक्ति संस्थात्मक क्वारंटाईन असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.