धरणगाव (प्रतिनिधी) मृतदेह पुरलेल्या कबरींवरून वाळू वाहतूक सुरु असल्याचा संतापजनक प्रकार तालुक्यातील नांदेड गावात उघडकीस आला आहे. याबाबत मणियार बिरादरीच्या समाज बांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, सर्व प्रकार दिवसाढवळ्या होत असतांना काहीही कारवाई होत नाही. त्यामुळे मृतांच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या वाळू माफियांना यंत्रणा घाबरते का?. असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
या संदर्भात अधिक असे की, काही दिवसांपूर्वी धरणगाव शहरालगत शासकीय वाळू डेपो सुरु करण्यात आला आहे. वाळू वाहतुकीचा ठेका भुसावळ येथील एका बड्या राजकीय व्यक्तीच्या नावावर असल्याचे कळते. वाळू वाहतूक सुरु झाल्यापासूनच नांदेड ग्रामस्थ याबाबत नाराजी व्यक्त करीत आहेत. भविष्यातील पाणी टंचाई आणि निसर्गाचा होणारा ऱ्हास याविरुद्ध संपूर्ण गाव एकवटलेले आहे. परंतू शासकीय काम असल्याचा गैरफायदा घेत वाळू माफिया दादागिरी करत आहेत.
नांदेड आरोग्य केंद्राच्या समोर मणियार बिरादरीची स्मशानभूमी आहे. वाळू माफियांनी समाज बांधवांची परवानगी न घेता वाळू वाहतुकीसाठी रस्ता बनविला. सुरुवातील वाद नको तसेच बाजूने वाहतूक करतील म्हणून मणियार समाज बांधवांनी याकडे दुर्लक्ष केले. परंतू काही दिवसांपासून वाळू माफियांनी मृतदेह पुरलेल्या कबरींवरून वाळू वाहतूक सुरु केल्यामुळे समाज बांधव कमालीचे संतप्त झाले आहेत.
याबाबत समाज बांधवांनी वाहतूक करणाऱ्या चालकांना याबाबत विनंती केली असता त्यांनी उलट समाज बांधवांना तुमच्याकडून जे होईल ते करा. आम्हाला अडविले तर तुमच्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल करू, अशा धमक्या दिल्याचा आरोपीही मणियार समाज बांधवांनी केला आहे. एवढेच नव्हे तर कबरींची विटंबना होईल, असे काहीसे कृत्य करत असल्याचा खळबळ जनक आरोप देखील समाज बांधवांनी केला आहे. याबाबत मणियार समाज बांधव जिल्हाधिकाऱ्यांकडे रीतसर लेखी तक्रार करणार आहेत. दरम्यान, वाळू माफियांनी सर्व लाज सोडली असून एकप्रकारे मृतांच्या टाळूवरील लोणी खात असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या वाळू माफियांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील मणियार समाज बांधवांनी केली आहे.
फोनवरून माझ्याकडे नांदेड येथील समाज बांधवांनी हकीगत सांगितली. घडत असलेला प्रकार तळ पायाची आग मस्तकात नेणारा आहे. प्रशासनाने या प्रकरणात तात्काळ लक्ष घातले पाहिजे. आम्ही लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार करणार असून दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार आहोत.
– फारुख शेख (मणियार बिरादरी जिल्हाध्यक्ष, जळगाव)
आम्ही बऱ्याचदा या गोष्टी विरुद्ध आवाज उठविला. परंतू वाळू माफिया जुमानत नाहीत. याबाबत आज समाज बांधवांची बैठक होणार असून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत रीतसर लेखी तक्रार करणार आहोत.
– अनिस पटेल (समाज बांधव, नांदेड)
याबाबत आम्ही काही बोलायला गेलो तर वाळू माफिया गुंडगिरीवर उतरतात. वाळू माफिया कबरींची विटंबना होईल, असे काहीसे कृत्य करत आहेत. तेथे मद्याच्या बाटल्या देखील आढळून आल्या आहेत. प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष देत दोषींवर कारवाई करावी.
-अजीम मणियार (समाज बांधव, नांदेड)