मुंबई (वृत्तसंस्था) टीआरपी घोटाळ्यात मुंबई पोलिसांकडून अटकसत्र सुरूच असून, बार्कच्या माजी सीओओ रोमिल रामगढिया यांना आज, गुरुवारी विशेष पथकाने अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता अटकेतील आरोपींची संख्या १४ वर पोहोचली आहे.
टीआरपी घोटाळा प्रकरणात रविवारपासून अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी यांना एस्प्लानेड मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने काल, बुधवारी सशर्त जामीन मंजूर केला. त्यानंतर आज, या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल चे माजी मुख्य ऑपरेशन ऑफिसर (सीओओ) रोमिल रामगढिया यांना अटक केली. बार्क संस्थेशी संबंधित ही पहिलीच अटक करण्यात आली आहे. रोमिल रामगढिया यांची अटक ही या प्रकरणातली चौदावी अटक आहे. मात्र, पहिल्यांदाच बार्क या प्रेक्षक संख्येची पाहणी करणाऱ्या संस्थेशी संबंधित अटक करण्यात आली आहे. टीआरपी घोटाळ्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक केल्यानंतर रोमिल रामगढिया यांना करण्यात आलेली अटक महत्वपूर्ण मानली जातेय. रोमिल रामगढिया हे रिपब्लिक टीव्हीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाच्या थेट संपर्कात असल्याचं सांगितलं जात आहे. बार्क BARC म्हणजे ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल ही टीव्ही चॅनेल्सची प्रेक्षकसंख्या मोजणारी संस्था आहे. या संस्थेनेच सुचवल्यावरुन मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळ्याचा तपास सुरु केला होता. त्या बार्क संस्थेच्या माजी कार्यकारी प्रमुखाला म्हणजे चीफ ऑपरेटिंग ऑफिसरला अटक करण्यात आलीय. मुंबई पोलिस आयुक्तांनी ऑक्टोबर महिन्यात पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये ईडीने सुद्धा या प्रकरणी चौकशी सुरु केली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी सर्वात आधी हंसा रिसर्च या संस्थेच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक केली होती. हंसा रिसर्चच्या दोन कर्मचाऱ्यांसोबतच फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या मराठी चॅनेलच्या मालकांनाही अटक करण्यात आली होती. रोमिल रामगढिया यांनी जुलै २०२० मध्ये बार्कमधील सीओओ पदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा बार्कमधील कार्यकाल हा तब्बल सहा वर्षांचा होता. या घोटाळ्याप्रकरणी सर्वात आधी अटक करण्यात आलेले हंसा रिसर्चचे कर्मचारी ज्या घरात पीपल मीटर बसवण्यात आलं आहे, त्यांना ठराविक चॅनेल पाहण्यासाठी पैसे देत असल्याचा आरोप पोलिसांनी तपास केल्यानंतर केला होता.
















