भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील श्रीराम नगर,बालाजी लॉन समोरी रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकी चालक प्रमोद वना झोपे (वय ५८) हे जागीच ठार झाले. तर त्यांचा मुलगा धिरज प्रमोद झोपे (वय ३२) हा जखमी झाला असून भुसावळ रिदम हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. ट्रक चालक घटनास्थळा वरून पसार झाला होता. घटनास्थळी श्रीराम नगर परिसरातील नागरीकांसह आमदार संजय सावकारे यांनी काही वेळ रस्ता रोको आंदोलन केले होते.
या संदर्भात अधिक असे की, प्रमोद वना झोपे आणि त्यांचा मुलगा धीरज झोपे दुचाकीने जात असताना महामार्गावर ट्रकने धडक दिल्यामुळे यात प्रमोद झोपे ( वय (५८) यांचा मृत्यू झाला तर मुलगा धीरज झोपे (वय ३२) हे जखमी झाले आहे. महामार्ग अपघात झाल्याचे माहिती कळताच त्याच बाजूने जात असलेले आमदार संजय सावकारे यांनी महामार्गावर रात्री रस्ता रोको आंदोलन सुरू केले. दत्तनगरमध्ये जाण्यासाठी अंडरपासची तात्काळ सुविधा करावी, अशी मागणी नागरिकांनी केली.
अपघाताचे वृत्त कळताच डीवायएसपी कृष्णात पिंगळे, पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला होता. जखमी धीरज झोपे याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. माजी नगरसेवक निर्मल कोठारी, किरण कोलते यांच्यासह अन्य जणांनी घटनास्थळी धाव घेतली. राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याने या मार्गावर अंडरपास सुरू करावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी लावून धरली होती. रात्री उशिरापर्यंत दोन्ही बाजूने महामार्ग रोखल्यामुळे महामार्गावर दोन्ही सुमारे दोन दोन किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.