जम्मू-काश्मीर (वृत्तसंस्था) जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी आता महिला आणि मुलांनाही लक्ष्य करत आहेत. आज बडगाम जिल्ह्यात बुधवारी एका ३५ वर्षीय टीव्ही अभिनेत्रीची दहशतवाद्यांनी (Terrorist Attack) गोळ्या झाडून हत्या केली. या हल्ल्यात महिलेचा भाचाही जखमी झाला आहे. आमरीन भट्ट (वय ३५) असं हत्या झालेल्या अभिनेत्रीचं नाव आहे.
आमरीनवर हा हल्ला रात्री ८ वाजेच्या सुमारास झाला, त्यावेळी आमरीन घरात होती. या हल्ल्यात आमरीनच्या पुतण्याच्या हातालाही गोळी लागली आहे, मात्र त्याची प्रकृती आता स्थिर आहे. दरम्यान, गोळी लागल्यानंतर आमरीन भट्टला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाचे तीन दहशतवादी सामील असल्याचे काश्मीर पोलिसांचे म्हणणे आहे.
दरम्यान, पोलिसांनी परिसराची नाकाबंदी करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. जम्मू काश्मिरमध्ये दहशतवाद्यांचे हल्ले सुरूच आहे. यापूर्वी श्रीनगरमधील अंचर भागात एका पोलीस हवालदाराची त्याच्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सैफुल्लाह कादरी असे पोलीस हवालदाराचे नाव असून कादरी हे सौरा येथील रहिवाशी होते. या हल्ल्यात त्यांची 7 वर्षांची मुलगीही जखमी झाली आहे.