नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ट्विटर आणि केंद्र सरकारमधील वाद अधिक चिघळत चालला आहे. आता ट्विटरने केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांचं ट्विटर अकाऊंट लॉक केलं आहे. त्यांचं अकाऊंट तासभरासाठीच लॉक करण्यात आलं होतं. मात्र आता मंत्र्यांनी ट्विटरला लक्ष्य केलं आहे. ट्विटरनं आपली बाजू मांडताना म्हटलं आहे की, मंत्री महोदयांनी कंपनीच्या पॉलिसीचं उल्लंघन केलं आहे. तासाभरानंतर मंत्र्यांचं अकाऊंट अनलॉक करण्यात आलं.
रविशंकर प्रसाद यांनी स्वत: पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. रविशंकर प्रसाद यांनी शुक्रवारी अशी माहिती दिली की त्यांचं ट्विटर अकाउंट तब्बल एका तासासाठी ब्लॉक करण्यात आलं होतं. त्यांनी असं म्हटलं आहे की ट्विटरने त्यांच्या अकाउंटचा अॅक्सेस जवळपास एका तासासाठी बंद ठेवला होता आणि याकरता अमेरिकेच्या Digital Millennium Copyright Act या कायद्याचं उल्लंघन केल्याचा हवाला देण्यात आला होता. केंद्रीय मंत्र्यांनी या घटनेबाबत माहिती देताना काही स्क्रीनशॉट देखील शेअर केले आहेत. ज्यामध्ये पहिल्या स्क्रीनशॉटमध्ये ट्विटरने ते कारण सांगितलं आहे की, त्यांच्या अकाउंटचा अॅक्सेस का बंद करण्यात आला होता, तर दुसऱ्या स्क्रीनशॉटमध्ये अॅक्सेस परत मिळाल्याची माहिती देण्यात आली होती.
एका तासानंतर अकाऊंट सुरु झाल्याची माहिती रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे. रविशंकर प्रसाद यांनी अकाऊंट लॉक असताना आणि अनलॉक करण्यात आल्यानंतरचे स्क्रीन शॉट शेअर करत ट्विटरवर आरोप केले आहेत. रविशंकर प्रसाद आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, आज अत्यंत विचित्र काहीतरी घडले. अमेरिकेच्या डिजिटल मिलेनियम कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन होत असल्याच्या आरोपानुसार ट्विटरने जवळजवळ आपल्याला एका तासासाठी लॉगीन करण्यापासून मज्जाव केला. त्यानंतर जवळपास एका तासानंतर त्यांनी खातं अनलॉक केल्यानंतर लॉगीन करता आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ट्विटरची ही कृती माहिती तंत्रज्ञान कायदा २०२१च्या नियम ४(८) चं उल्लंघन करते. ट्विटरनं माझ्या खात्यावर कारवाई करण्यापूर्वी त्यासंबंधीची नोटीस द्यायला हवी होती. मात्र त्यांनी तसं केलं नाही, असं रविशंकर प्रसाद म्हणाले.
काही दिवसांपूर्वी ट्विटरने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही महत्त्वाच्या नेत्याच्या पर्सनल ट्विटर अकाउंटवरील ब्लू टिक हटवली होती. वाद वाढल्यानंतर ट्विटरने उपराष्ट्रपतींच्या पर्सनल अकाउंटची ब्लू टिक पुन्हा सक्रीय केली. यावेळी ट्विटरनं असं स्पष्टीकरण दिलं होतं की, जुलै २०२० पासून अकाउंट लॉग इन केल्यानं असं झालं होतं.
अमेरिकन सोशल मीडिया कंपनी असणाऱ्या ट्विटरने केलेली ही कारवाई अशावेळी समोर आली आहे जेव्हा भारत सरकार आणि ट्विटरमध्ये आयटी नियमांवरुन वाद सुरू आहेत.