जळगाव (प्रतिनिधी) जामनेर जाण्यासाठी निघालेल्या रिक्षा चालकाला कारमध्ये बसवून लुटमार करणाऱ्या आरोपींपैकी दोघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. वसीम खान अजमल खान व सलीम खान उर्फ गुड्डू इब्राहीम खान असे अटक केलेल्या संशयित आरोपींचं नावं आहेत. दरम्यान, यातील वासिम खानवर पुण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे.
या संदर्भात अधिक असे की, दीपक रतिलाल माळी (वय-२८, रा. पाळधी ता. धरणगाव) हे जळगाव ते पाळधी दरम्यान रिक्षा चालवतात. ते बुधवारी दुपारी २ वाजता जामनेरला जाण्यासाठी अजिंठा चौफुलीवर आले. रिक्षा लावल्यानंतर जामनेर जाण्यासाठी रोडवर उभे असतांना कार (एमएच-१८, डब्ल्यू- ४५८८) आली. त्यातील चालकाने जामनेर जाण्यासाठी विचारल्यानंतर दीपक हे जामनेर जाण्यासाठी कारमध्ये बसले. परंतू पुढे रेमंड चौकात कार थांबवून कारच्या बाजूला बसलेले अज्ञात व्यक्तींनी दोन्ही हात पकडून पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी दीपक यांना मारहाण करण्यास सुरुवात केली आणि खिशातील १२५० रुपये बळजबरीने हिसकावून जिवे मारण्याची धमकी देत कारमधून खाली उतरवून दिले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी तपासचक्र फिरवीत दोन आरोपींना अटक केली आहे. त्यात वसीम खान अजमल खान (वय ३०, रा. दूध डेरी जवळ साथी बाजार नशिराबाद, ह.मु. दगडू हलवाई गणपती शिवनेरी नगर, कोंढवा पुणे) व सलीम खान उर्फ गुड्डू इब्राहीम खान (वय ३३ रा. रहमान शहा बाबा दर्ग्यामागे नशिराबाद, ह. मु. गणपती मंदिराच्या बाजूला शिवनेरी नगर कोंढवा पुणे) या दोघांना अटक केली आहे. तर नईम (रा. शिवाजी नगर पुणे, पूर्ण नाव माहित नाही) आणि वासिम (रा. नशिराबाद) या दोघांचा शोध सुरु आहे.