धाराशिव (वृत्तसंस्था) जलकुंभाच्या उभारणीच्या खोदण्यात आलेल्या खड्डयातील पाण्यात पोहण्यास गेलेल्या दोन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना धाराशिव जिल्ह्यातील विजोरा (ता. वाशी) येथे घडली आहे. गावातील प्रविण कल्याण साळुंके (वय ८) व यश महादेव वाघमारे (वय ९), असे मयत बालकांची नावे आहेत.
वाशी तालुक्यातील विजोरा येथे गावाच्या पाणीपुरवठा योजनेसाठी जलकुंभ उभारण्याकरीता खड्डा खोदण्यात आलेला होता. या खड्डयात साचलेल्या पाण्यात गावातील प्रविण साळुंके व यश वाघमारे हे दोघे रविवारी दुपारी पोहण्यासाठी गेले होते. दुपारी तीन वाजेच्या सुमारास या दोघांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडून मयत झाले.
मुले बराच वेळ घरी न आल्याने कुटुबियांनी शोधाशोध सुरू केली असता जलकुंभाच्या खड्याजवळ त्यांचे कपड व चप्पल दिसून आली. त्यावेळी पाण्यात शोध घेतला असता दोघांचे मृतदेह आढळून आले. याप्रकरणी महादेव वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक बलभीम यादव हे करीत आहेत.