जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बिलखेडा येथील ६२ वर्षीय वृद्ध तर पाचोरा तालुक्यातील जामनेर (सार्वे) येथील २६ वर्षीय तरुण या दोघ शेतकऱ्यांनी नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली आहे.
जळगाव तालुक्यातील बिलखेडा येथे पहिल्या घटनेत माधवराव श्रावण कुंभार (वय ६२) य वृध्द शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. माधवराव कुंभार हे गावात कुंभार व्यवसाय करीत होते. तसेच त्यांची शेती असून त्यात देखील ते काम करीत असत. नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दुसऱ्या घटनेत पाचोरा तालुक्यातील जामने (सार्वे) येथिल तरुण शेतकरी राहुल राजेंद्र पाटील (वय २६) याने कपाशीचे अपेक्षित उत्पन्न न आल्याने नैराश्यातून आत्महत्या केली. राहुल पाटील यांनी वडीलांकडूनच पाच एकर शेती कसण्यासाठी घेतली होती. त्यात कपाशीचे पीक लावले होते. मात्र, अतिवृष्टीमुळे पिक वाया गेले. केलेला खर्च देखील मिळाला नाही. ही परिस्थिती उद्भवल्यानंतर आता वडीलांना पैसे कसे द्यायचे घर कसे चालवायचे अशा विवंचनेतून त्यांना नैराश्य आले होते. त्यातून त्यांनी शेतातीलच शेड मध्ये गळफास घेत आत्महत्या केली.