पाटोदा (प्रतिनिधी) पाटोदा तालुक्यात असलेल्या धनगरजवळका या गावांमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. जेवण करुन आपल्या घरासमोर शतपावली करणाऱ्या दोन सख्ख्या बहिणीला एका भरधाव स्कॉर्पिओने धडक दिली. या अपघातात दोघी बहिणींचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रोहिणी महारुद्र गाडेकर (वय २६) व मोहिणी महारुद्र गाडेकर (वय २२) अशी अपघातात ठार झालेल्या बहिणींची नावे आहेत.
यासंदर्भात अधिक असे की, रोहिणी व मोहिनी गाडेकर या दोघी बहिणी आपल्या धनगर जवळका या गावी आल्या होत्या. रोहिणी ही नर्सिंगचे शिक्षण घेत आहे. तर मोहिनी एका खासगी कंपनीत नोकरी करीत होती. या दोघी बहिणी रात्री जेवण केल्यानंतर दारासमोर उभ्या राहिल्या. भरधाव वेगात आलेली जीप (एमएच १२ एमआर ९११३) चालकाचे नियंत्रण सुटल्याने दोघींना जोराची धडक दिली. यात दोघी गंभीररित्या जखमी होऊन ठार झाल्या. जीप चालकाने पुढे जाऊन अन्य एकास धडक दिली. त्यानंतर चालक फरार झाला. पाटोदा पोलिसांनी सदरील जीप ताब्यात घेतली आहे. दोघी बहिणींच्या मृतदेहांची बीड जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.