धरणगाव (प्रतिनिधी) बांभोरी येथून पेट्रोल घेवून घरी जाणाऱ्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याची घटना आज दुपारी घडली. यात दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला आहे. योगेश मराठे (वय-१९ रा. बोरगाव ता. धरणगाव) असे मयत तरूणाचे नाव आहे
यासंदर्भात अधिक असे की, योगेश मराठे हा तरूण (एमएच १९ डीयू ५३७९) क्रमांकाच्या दुचाकीने गावापासून जवळ असलेल्या बांभोरी येथे पेट्रोल घेण्यासाठी आला होता. दुपारी ३ वाजेच्या सुमारास पेट्रोल घेवून परत गावाकडे जात असतांना समोरून अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने योगेश मराठे हा जागीच ठार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह धरणगाव ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला आहे.