जळगाव (प्रतिनिधी) एलसीबीला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, एलसीबीच्या पथकाने जळगाव शहरासह तसेच जिल्ह्यातून दुचाकी चोरी केल्याच्या संशयावरून संशयित आरोपीस अटक केली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शफी खान अन्वर खान पठाण (वय-२६) असे आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण बकाले यांना मिळलेल्या माहितीवरून त्यांनी विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, प्रीतम पाटील, राहुल पाटील, नितीन बाविस्कर यांचे पथक स्थापन केले होते. पथकाने चाळीसगाव शहरात बसस्थानकाजवळ असलेल्या संकुलाजवळून शफी खान अन्वर खान पठाण या आरोपीस ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे चोरीच्या वाहनांबाबत विचारपूस करण्यात आली आहे. त्याच्याकडून चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, जळगाव शहर पिंपळगाव हरेश्वर आदी ठिकाणी चोरी केलेल्या दुचाकी मिळून येण्याची शक्यता आहे. त्याला पुढील तपासासाठी जिल्ह्यापेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
















