वाशीम (वृत्तसंस्था) शेतीचा चतुः सिमा नकाशा देण्याच्या मोबदल्यात तीनशे रुपयांची लाच स्विकारताना मालेगाव येथील भुमि अभिलेख कार्यालयातील दोन महिला कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. कनिष्ठ लिपीक संगिता काकडे व परिचर संध्या सराटे अशी लाच स्विकारणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. ही कारवाई आज २३ रोजी वाशीम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मालेगाव तालुक्यातील तक्रारदार शेतकऱ्यास त्याचे शेतीच्या चतु:सिमेचा नकाशाची गरज होती. यासाठी त्याने भुमि अभिलेख कार्यालय गाठून तशी मागणी केली असता त्याला तीनशे रुपये लाचेची मागणी करण्यात आली. सदर रक्कम देणे मान्य नसल्याने त्याने वाशीम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तशी तक्रार नोंदविली. त्यानुसार वाशीम एसीबीचे पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात केलेल्या पडताळणीत लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन एसीबीच्या पथकाने बुधवारी सापळा रचला असता या दोनही कर्मचारी जाळ्यात अडकल्या.
या कर्मचाऱ्यांना लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी मालेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सदर कारवाई एसीबी अमरावतीचे पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके यांच्या नेतृत्त्वातील पथकाने केली. दोन महिला कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे.
















