मॉस्को (वृत्तसंस्था) पाश्चात्य देशांकडून आमच्या देशावर लादण्यात आलेले निर्बंध हे युद्धाच्या घोषणेप्रमाणे आहे, असं म्हणत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पाश्चात्य देशांना गंभीर इशारा दिला आहे. दरम्यान, अनेक पाश्चात्य देशांनी युद्धाला विरोध करत रशियावर निर्बंध लादल्यावरही रशियाने युक्रेनवर हल्ले सुरूच ठेवले आहेत.
असोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार पुतिन यांनी शनिवारी मॉस्कोजवळ फ्लाइट अटेंडंटच्या एका गटाला सांगितले की, “हे जे निर्बंध लादले जात आहेत, ते युद्ध घोषित करण्यासारखे आहेत. युक्रेनमध्ये नो-फ्लाय झोन स्थापित करण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास त्याचे युरोप आणि जगाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा पुतिन यांनी दिला आहे. नाटोने नो-फ्लाय झोनची युक्रेनची राजधानी किव्हची विनंती नाकारली आहे. कारण असं केल्यास ते रशियाला मोठे युद्ध करण्यास प्रवृत्त करण्यासारखं होईल, असं मत त्यांनी नोंदवलं. दरम्यान, युक्रेनमध्ये रशियाच्या आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून, पाश्चात्य देशांनी रशियाच्या मध्यवर्ती बँकेवर कठोर निर्बंध घातले आहेत. कंपन्यांना रशियामध्ये व्यवसाय करण्यास मनाई केली आहे. तसेच परदेशात oligarchs च्या नौका आणि लक्झरी मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात केली आहे.