धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील पारोळा रोडवरील मुस्लीम कब्रस्तानात शौचविधी केला असल्यामुळे अस्वच्छता पसरण्यासोबत धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. याबाबत मुस्लिम कब्रस्तान कमेटीच्या वतीने पालिकेला निवेदन देण्यात आले आहे. तर दुसरीकडे तात्काळ बंदोबस्त न झाल्यास पालिकेसमोर उपोषणास बसण्याचा इशारा माजी नगरसेवक तथा युवा मुस्लीम नेते हाजी इब्राहीम शेख यांनी दिला आहे.
मुस्लिम कब्रस्तान कमेटीच्या वतीने पालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुस्लिम कब्रस्तान कंपाउंडच्या आत येवून काही लोक सकाळ-संध्याकाळी शौचालयास बसतात. कब्रस्तानाचा आवारात घाण करतात. पारोळ रोडकडे पुरुष तर इदगाह मैदानाकडे स्त्रिया बसतात. वारंवार सूचना देऊनही कोणीही ऐकण्यास तयार नाही. एका धर्माची दफनभुमी असतांना त्याठिकाणी येवून शौचास बसणे, त्यांच्या भावना दुखावणे, हे कितीपत योग्य आहे?. तसेच इदगाह मैदानाकडे काही लोकांनी भितीलगत अतिक्रमण केलेले आहे. तरी भिती पासून अतिक्रमण हटविण्यात यावे. कब्रस्तानचा आवारात होणाऱ्या घाणीवर व अतिक्रमणावर उपाययोजनाकरून कार्यवाही करावी, असे निवेदनात म्हटले आहे. तर दुसरीकडे याबाबत तात्काळ कारवाई न झाल्यास माजी नगरसेवक तथा युवा मुस्लीम नेते हाजी इब्राहीम शेख यांनी पालिकेसमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.