बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील जामठी येथील पाच दुकाने फोडून अज्ञात चोरट्यांनी मुद्देमालासह रोकडही लंपास केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी या पाचही दुकानातून सुमारे 72 हजाराची चोरी केली असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या ठिकाणी झाल्या चोऱ्या !
याबाबत अधिक वृत्त असे की, बोदवड तालुक्यातील जामठी येथे शुक्रवारी मध्यरात्र ते पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बस स्थानकावरील पाच दुकाने फोडीत चोरी केल्याचे निष्पन्न झालेले आहे. यात बस थांब्या जवळील अमोल प्रोव्हीजन या किराणा दुकानातील 14 हजार रुपये रोख रक्कम तथा 5 हजार रुपये किमतीचे सीसीटीव्हीचे डीव्हीआर व सुकामेवा चोरट्यांनी लंपास केलेला असल्याची माहिती किराणा दुकान मालक काशिनाथ गुलाबचंद तेली यांनी फिर्यादीत दिलेली आहे. तर या दुकानासमोरील असलेल्या महाजन कृषी केंद्र येथील 21 हजार 600 रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची फिर्याद कुणाल भगवान महाजन यांनी दिलेली आहे. साई राणा कृषी केंद्रातील सुमारे 5 हजार रुपये रोख रक्कम आणि पाच हजार रुपये किमतीचा सीसीटीव्ही डीव्हीआर चोरट्यांनी लंपास केल्याची कृषी केंद्र चालक सुरेंद्र उमरावसिंग पाटील यांनी फिर्यादीमध्ये माहिती दिलेली आहे. तसेच ग्राहक सेवा केंद्र मधील संदीप विठ्ठल महाजन यांच्या मालकीच्या दुकानातून ८ हजार रुपये रोख रक्कम व ५ हजार रक्कमेचा सीसीटीव्हीटी डीव्हीआर चोरट्यांनी लंपास केला आहे. येथीलच सद्गुरू जनरल स्टोअर मधील चोरट्यांनी 2 हजार 500 रुपये रोख तथा ७ हजार ५०० रुपये किमतीच्या वायर तथा कास्मेटिक पावडर व इतर साहित्य चोरट्याने लंपास केलेले आहे.
श्वान पथकाला प्राचारण
चोरीच्या घटना या रेकॉर्ड होऊ नये याकरता चोरट्यांनी सर्व ठिकाणच्या डीव्हीआर चोरी करून नेल्या आहे. या घटनास्थळी पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी पाहणी केली .जळगाव येथील श्वान पथकाला ही प्राचारण करण्यात आले होते. जंजीर नावाच्या श्वानाने प्रत्येक दुकानात जाऊन चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी बोदवड पोलीस स्थानकातअज्ञात चोरट्यांच्या विरोधात भादवी कलम 457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .असूनअधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांचे मार्गदर्शनाखाली सुधाकर शेजोळे करीत आहेत.दरम्यान जामठी पासून जवळच असलेल्या जामनेर तालुका हद्दीतील बेटावद बु।। येथे सुद्धा दोन दुकाने चोरट्यांनी याच दिवशी फोडल्याचे समजते.