जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव, चाळीसगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पाचोरा, भडगाव, चाळीसगाव तालुक्यात शनिवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला.
चाळीसगाव तालुक्यातील वाघडूसह परिसरात रात्री ८ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली, तसेच आडगाव परिसरात वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांनी कापून ठेवलेला दादर ज्वारी, बाजरी, मक्याचा चारा व कणसे ओले झाले. तर कुट्टी व कुट्टीसाठी एका ठिकाणी जमा करून ठेवलेल्या चाऱ्याचेही पावसामुळे नुकसान झाले. बाळद परिसरातदेखील रात्री उशिरा वादळी वान्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. उंबरखेडला विजांच्या कडकडासह जोरदार वादळ झाले.
गुढे (ता. भडगाव) परिसरात जोरदार वादळ झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. कळमडू परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने हाताशी आलेले ज्वारी व बाजरीचे पीक जमीनदोस्त झाले आहे. अंधारीसह परिसरातही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्याच प्रकारे वरखेडी (ता. पाचोरा) येथे रात्री ८:४५ वाजता वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. त्यामुळे वीजप्रवाह खंडित झाला होता. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भडगाव तालुक्यातील महिंदळे व आमडदे परिसरातही पावसाने मोठे नुकसान केले.