जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादीचे (ncp) नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिनी खडसे (rohini khadse) यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाद पेटला आहे. पण, या प्रकरणाची आयपीएस अधिकाऱ्यांना मार्फत निपक्षपणे चौकशी करा, दोषी असतील कारवाई करू पण तोपर्यंत एकनाथ खडसे व त्यांच्या परिवाराने शिवसेनेला बदनाम करू नका, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील (Shiv Sena leader Gulabrao Patil) यांनी दिली.
मुक्ताईनगर येथे दोन दिवसांपूर्वी अॅड. रोहिणी खडसे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. याप्रकरणी रोहिणी खडसे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ल्याचा आरोप केल्याने त्यानुसार गुन्हा दाखल आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर आरोप केल्याने त्यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अजिंठा विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. याप्रकरणात पहिल्यांदाच प्रतिक्रीया देताना त्यांनी खडसे कुटुंबीयांना धारेवर धरत आरोप केले.
शिवसेनेला बदनाम करू नका
जोपर्यंत पोलिसांकडून चौकशी होत नाही तोपर्यंत आरोप करणे चुकीचे आहे. आमदारांनीच विधानसभेत या प्रकरणाची आयपीएस अधिकाऱ्यांकडून निपक्षपातीपणा चौकशीची मागणी केली आहे. त्यानुसार चौकशी झाल्यानंतर दूध का दूध और पानी का पानी होईलच, यात दोषी आमच्या पक्षाचा असला तरी हयगय करणार नाही. मात्र पोलिसांकडून चौकशी होऊन नेमकं तथ्य समोर येईपर्यंत शिवसेनेला बदनाम करू नये, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
आमदार पाटील यांना प्रमाणपत्र देऊ नये
‘आमदार चंद्रकांत पाटील हे सेनेचे नाहीत. या एकनाथ खडसे यांच्या विधानाबाबत बोलताना पालकमंत्री म्हणाले की, आमदार चंद्रकांत पाटील हे कोणत्या पक्षाचे त्याचे सर्टिफिकेट एकनाथ खडसेंनी देऊ नये. तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. कोण कोणत्या पक्षात होता आणि पक्ष सोडून आता कोणत्या पक्षात आहे हे सर्व जगाला माहिती आहे, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंना टोला लगावला.