जळगाव (प्रतिनिधी) : नॉनक्रिमीलीअर प्रमाणपत्रासाठी शासनाच्या पोर्टलवर अपलोड केलेले कागदपत्रे फसवणुकीसाठी मिळविल्याचा प्रकार समोर आला आहे. फसवणूक व गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीवरून शैलेंद्र काशीनाथ सपकाळे (रा. चौघुले प्लॉट, कांचननगर) यांच्याविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांच्या मुलांच्या शैक्षणिक कामासाठी नॉनक्रिमीलीअर प्रमाणपत्र काढण्यासाठी त्यांनी सेवा सेतू केंद्राच्या माध्यमातून आधारकार्ड, टीसी, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, घोषणापत्र दि. २६ फेब्रुवारी रोजी शासनाच्या पोर्टलवर अपलोड केले होते. त्या नंतर दि. १३ मार्च रोजी खोटे स्वयंघोषणापत्र देऊन उत्पन्नाचा दाखला मिळविल्याने तहसील कार्यालयात सुनावणीसाठी हजर राहण्याविषयी गुप्ता यांना कळविण्यात आले. या संदर्भातील प्रमाणीत प्रतीसाठी गुप्ता यांनी तहसील कार्यालयात अर्ज केला. त्यावेळी प्राप्त झालेल्या दस्ताऐवजामध्ये शैलेंद्र सपकाळे याने दि. २७ फेब्रुवारी रोजी दिलेल्या अर्जामध्ये नॉनक्रिमीलीअर प्रमाणपत्रासाठी दिलेले कागदपत्रे आढळले. हा प्रकार समोर आल्यानंतर खुशी दीपककुमार गुप्ता या विद्यार्थिनीने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून शैलेंद्र सपकाळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.














