जळगाव (प्रतिनिधी) कर्ज वाढल्याने चालकाने पोलिस अधिकाऱ्याशी हातमिळविणी करून हा ट्रक चोरीला गेल्याचा खोटा गुन्हा दाखल करून घेतला. या प्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक भरत चौधरी यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. बदलीचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले.
वरणगाव येथे ट्रक चालक वास्तव्यास असून तो कर्जबाजारी झाला होता. तसेच ट्रकसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते देखील थकले होते. त्याने वरणगाव पोलीस ठाण्यात ट्रक चोरीस गेल्याची खोटी तक्रार दिली होती, त्यानुसार सहा. पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांनी गुन्हा दाखल केला होता. हा ट्रक चालकाने धुळे येथील एका भंगार व्यवसायीकाकडे नेवून तो मोडला. त्यातून त्याला लाखो रुपये मिळाले होते. त्यानंतर चालकासह पोलिसांनी संगनमत करुन त्या ट्रकचा इन्शुरन्स देखील पास करुन घेतला होता. त्यातून मिळालेले सात लाख रुपयांची रोकड दोघांची हडप केल्याची तक्रार पोलीस अधीक्षक यांच्याकडे दाखल झाली होती.
या तक्रारीची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत संबंधित ट्रक चालकाला ताब्यात घेतले. त्याला खाकी हिसका दाखविताच त्याने संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरुन ट्रक चोरीचा खोटा गुन्हा दाखल केला. तसेच तो ट्रक भंगारमध्ये मोडून तो विकला आणि त्याच्या इन्शूरन्सची देखील रक्कम दोघांनी हडप केल्याची कबुली त्याने दिली. संपुर्ण घटना समोर आल्यानंतर या प्रकाराची तात्काळ दखल घेत पोलीस अधीक्षकांनी तात्काळ वरणगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांची पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली केली असून याबाबतचे आदेश त्यांनी काढले आहे.
प्रभारी पोलीस अधिकारी यांची संबंधीत पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांसोबत वागणुक व्यवस्थीत देत नव्हते. त्यांच्या अनेक तक्रारी देखील प्राप्त झाल्या होत्या. संबंधीत ट्रक चालकाने यापुर्वी देखील पोलिसात ट्रक चोरीचे खोटे गुन्हे दाखल केले आहे. त्याने पुन्हा प्रभारी पोलिस अधिकाऱ्याला हाताशी धरुन बनावट गुन्हा दाखल केल्याची माहिती एलसीबीच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यांनी हा प्रकार वरिष्ठांच्या लक्षात आणून देत घटनेची पोलखोल केली.