नवी मुंबई (वृत्तसंस्था) वाशी टोल नाका तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर २०१४ साली वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात आज राज ठाकरे यांना जामीन मिळाला आहे. आज राज ठाकरे स्वत: वाशी कोर्टात हजर झाले होते. तर या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ मे रोजी केली जाणार आहे.
राज ठाकरे यांनी न्यायालयात दोन अर्ज केले होते. पहिला अर्ज जामिनासाठी होता तर दुसरा अर्ज हा पुढच्या वेळी सुनावणीला हजर न राहण्याचा होता. त्यांचे दोन्हीही अर्ज हे मंजूर झाले आहेत. १५ हजारांच्या जातमुचलक्यावर राज ठाकरेंना जामीन मंजूर झाला आहे. तसेच आता त्यांना या प्रकरणाच्या पुढच्या सुनावणीला हजर राहण्याची गरज नसणार आहे. वाशी न्यायालय परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कुणालाही आत जाण्यास परवानगी नाही. त्यासोबतच न्यायालयाबाहेर बॅरिगेटिंग लावण्यात आली आहे. राज ठाकरेंसोबत मनसेचे नेते नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर उपस्थित असल्याची माहिती आहे. महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने राज ठाकरेंचा हा नवी मुंबई दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. दरम्यान मनसैनिकांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. मनसैनिक न्यायालयाबाहेर दाखल झाले आहेत. वाशी टोलनाक्यावर राज ठाकरेंचे मनसैनिकांकडून स्वागत करण्यात आले.
महत्त्वाचे म्हणजे राज ठाकरे हे आज न्यायालयात हजर राहणार असल्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या स्वागतासाठी मनसैनिकांनी टोलनाक्यावरच पोस्टरबाजी केली असल्याचे पाहायला मिळत आहे. नवी मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे येत असल्याने याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न मनसेकडून केला जात आहे.
नवी मुंबईतील वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात बेलापूर न्यायालयाने वॉरंट जारी केलं होतं. २६ जानेवारी २०१४ रोजी वाशीमध्ये राज ठाकरे यांनी भडकावू भाषणाने मनसैनिकांनी वाशी टोलनाक्याची तोडफोड केल्याचा आरोप राज ठाकरेंवर करण्यात आला आहे. या प्रकरणी अनेक वेळा न्यायालयात हजर राहण्यास सांगूनही राज ठाकरे हजर झाले नव्हते. त्यामुळे वाशी न्यायालयाने राज ठाकरे यांच्याविरोधात वॉरंट जारी केलं. राज ठाकरे यांच्यावर आरोप आहे की, २६ जानेवारी २०१४ ला राज ठाकरे यांनी वाशी टोलनाका बंद करण्यासाठी भडकाऊ भाषण केले होते. हे भाषण त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या एका सभेदरम्यान केले होते. ज्यानंतर गजानन काळेंसह अनेक कार्यकर्त्यांनी वाशी टोलनाक्यावर तोडफोड केली होती. या प्रकरणी ३० जानेवारीला २०१४ ला वाशी पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला होता. या प्रकरणात २०१८ आणि २०२० मध्ये राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली होती.