अडावद, ता. चोपडा (प्रतीनिधि) कमळगाव येथे आठवडे बाजारात पाणीपुरी खाल्ल्याने कमळगाव, चांदसणी, मितावली, पिंप्री व पसिरातील शेकडो मुले, महिला व नागरिकांना विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. यातील काही मुलांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खासगी तसेच सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आरोग्य यंत्रणांनी धाव घेतली आहे.
येथून जवळच असलेल्या कमळगाव येथे सोमवारी आठवडे बाजार होता. बाजारात कमळगावसह परिसरातील खेड्यावरील चांदसणी, मितावली, पिंप्री येथील ग्रामस्थ बाजारासाठी आले होते. बाजारात पाणीपुरी विक्रेत्याचे ही दुकान होते. त्याच्याकडून अनेकांनी पाणीपुरी खाल्ली तर अनेकांनी पाणीपुरीचे पार्सल ही घरी नेले होते. सोमवारनंतर मंगळवारी पाणीपुरी खाणाऱ्या अनेकांना सकाळी उलट्या, संडास, पोटात दुखणे असा त्रास जाणवू लागला. तेव्हापासून अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी सरसावले. तर, सायंकाळी ६ वाजेनंतर अचानक रूग्णांच्या संख्येत वाढ झाली, त्यामुळे अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रासह, अडावद व चोपडा येथील खासगी रूग्णालयातही अन्नाची विषबाधा झालेल्या रूग्णांची संख्या वाढतच गेली. रुग्णालयातील रुग्ण व नातेवाईकांच्या चर्चेतून पाणीपुरी खाल्यानेच हि विषबाधा झाल्याचे सांगितल्याने निष्पन्न झाले. याचाचत पिंप्री येथील सोमनाथ जगन कोळी यांनी याबाबत पोलीस ठाण्यात लेखी जबाब दिला आहे.
दरम्यान, सायंकाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात पिंप्री, कमळगाव येथील अन्नातून विषबाधा झालेल्या बालकांसह रुग्ण संख्या वाढतच गेली. त्यानंतर अडावद येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना पाटील, धानोरा येथील डॉ. सोनाली देशमुख, वर्डीचे डॉ. दिनेश चौधरी व डॉ. राहुल पाटील, पंचक येथील खासगी डॉ. अजय पाटील, आरोग्य सहाय्यक विजय देशमुख, बविता वळवी, कविता पाडवी, सरगम ओसवाल, वाय. आर. पाटील, कैलास बडगुजर, घुडकू वारडे, विजया गावित आदींसह आरोग्य कर्मचाऱ्यांनी शर्थीचे उपचार सुरू करून रूग्णांना दिलासा दिला.
अडावद आरोग्य केंद्रात याखल झालेले कमळगाव, पिंत्री, रूखनखेडा आदी ठिकाणच्या सर्व विषबाधा झालेल्या रुग्णांना तातडीने अद्ययावत आरोग्य सेवा पुरवावी, असे आदेश जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना भ्रमणध्वनीद्वारे केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिलेत. भाजपचे महामंत्री राकेश पाटील यांनी या घटनेची माहिती ना. खडसे यांना कळवली. अडावद आरोग्य केंद्रात कमळगाव येथील १९, पिंप्री-२३, चांदसणी १७ व खाजगी रुग्णालयात ६० रुग्णांनी उपचार घेतले. रात्री उशिरापर्यंत आरोग्य केंद्रासह खासगी रुग्णालयात विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढतच होती, यात बालकांची संख्या अधिक होती. आज सांयकाळपर्यंत जवळपास १०० जणांना विषबाधेचा त्रास जाणवू लागला होता, परंतु, आरोग्य कर्मचाऱ्यांनी शर्थीचे उपचार केल्याने रूग्णांना दिलासा मिळाला.
यात डिपला कोळी (वय १६), आयर्न सपकाळे (वय ७), पवन सोनवणे (वय १३), निकिता कोळी (वय १३), चेतना सपकाळे (वय १९) यांच्यासह १५ ते २० जणांना पुढील उपचारासाठी चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच चौपडा तालुका आरोग्य अधिकारी डॉ, प्रदीप लासुरकर हे आपल्या आरोग्य पथकांसह दाखल झाले, त्यानंतर रुग्णांच्या उपचारास गती मिळाली. या वेळी गटविकास अधिकारी रमेश वाघ ही दाखल झाले होते.
अडावद आरोग्य केंद्रात रूग्णसंख्येत वाढ होताच ग्रामस्थांनी मदत कार्यासाठी धाव घेतली. यात भाजपचे पूर्व भागाचे महामंत्री राकेश पाटील, शिवसेनेचे सचिन महाजन, पी. आर. माळी, राष्ट्रवादीचे डी. पी. सांबूके, रियाजअली, कालू मिस्तरी, कमळगाव तंटामुक्तीचे अध्यक्ष गोरख हटकर, अडावदचे सामाजिक कार्यकर्ते राहूल बैरागी, अमोल कासार, जितेंद्र परदेशी, बिल्ला कोळी आदीसह अडावद पोलीस ठाण्यातील स.पो. नि. संतोष चव्हाण, पो. हे. कॉ. नासिर पठाण व भरत नाईक, होमगार्ड संजय पवार, संजय शेलकर, रामदास चव्हाण, प्रवीण महाजन, कृष्णा महाजन आदींनी आरोग्य कें द्रात धाव घेत मदत कार्यास हातभार लावला.