मुंबई (वृत्तसंस्था) एका चिमुकल्या पाहुणीचे आगमन क्रिकेटर विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी झाले आहे. सोमवारी दुपारी अनुष्काने मुलीला जन्म दिला असून ही आनंदाची बातमी नेटकऱ्यांना विराटने ट्विट करत सांगितली.
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री यांच्या घरी नव्या पाहुणीचं आगमन झालं आहे. विराट कोहलीने स्वत: सोशल मीडियावर याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे. विराट कोहलीने ११ डिसेंबर २०१७ रोजी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत आपली लग्नगाठ बांधली होती. विराटनं पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की, आज दुपारी आम्हाला मुलगी झाली. आम्ही आपल्या प्रेमाबद्दल मनापासून आभारी आहोत. अनुष्का आणि आमची मुलगी दोघीही ठीक आहेत. आमचं सौभाग्य आहे की जीवनाचा हा चॅप्टर आम्हाला अनुभवता आला. आता आम्हाला थोडी प्रायव्हसीची गरज आहे, असं विराटनं म्हटलं आहे. विराटने ऑगस्ट महिन्यात अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट करत ती गरोदर असल्याचे सांगितल होते. आम्ही जानेवारी २०२१ पासून दोनाचे तीन होणार असल्याचे कॅप्शन देत विराटने अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट केला होता.
अनुष्का गरोदरपणातही योगा आणि वर्कआउट करताना दिसून येत होती. अनुष्का सोशल मीडियावर फोटो पोस्ट करुन तिच्या गरोदरपणाचा प्रवास तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत होती. यादरम्यान अनुष्काने प्रसिद्ध वोग मॅगझिनसाठी फोटोशूट केलं होतं. ते फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.