बोदवड (प्रतिनिधी) सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू असुन बोदवड शहरातील नागरिकांना भिषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. जनावरांचे सुद्धा पाण्या अभावी हाल होत असून यामुळे नागरिकांना विकत घेऊन पाणी प्यावे लागत आहे. त्यासाठी एका टँकरला नागरिकांना पाचशे ते सातशे रुपये मोजावे लागत असल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय. विस बावीस दिवस उलटल्यानंतरही शहराला नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी नगरपंचायत मधील सत्ताधारी अपयशी ठरत आहेत.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी बोदवड नगरपंचायत निवडणुकीपूर्वी जुनोने धरण वरून तात्पुरती पाणी पुरवठा योजना करण्याची आणि त्यासाठी निधी मंजुर झाल्याची घोषणा केली होती. परंतु ती हवेत विरली. त्यानंतर त्यांनी नविन पाणी पुरवठा योजने संदर्भात दरवर्षी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सोबत बैठका घेऊन घोषणा केल्यात. परंतु नेहमीची येतो पावसाळा या उक्ती प्रमाणे दरवर्षी घोषणा करून सुद्धा अद्यापही नविन पाणी पुरवठा योजनेवर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. बोदवड शहरात आणि तालुक्यात असलेली तिव्र पाणी टंचाई बघता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे यांनी जळगाव जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना बोदवड शहर आणि तालुक्यासाठी पाणीटंचाईवर टॅंकर व इतर उपाययोजना करण्या संबंधी निवेदन देऊन मागणी केली होती.
परंतु प्रशासनातर्फे अद्यापही टॅंकर किंवा इतर कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याने पाणी टंचाई ची तीव्रता लक्षात घेऊन नागरिकांना या भिषण पाणीटंचाईमधून दिलासा मिळावा, यासाठी रोहिणीताई खडसे यांनी त्यांच्या सौजन्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून बोदवड शहरातील विविध प्रभागात विस टॅंकर द्वारे नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिले आहे.
यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक बोदवड शहरात टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करत आहेत. यातून नागरिकांना काही अंशी तरी दिलासा मिळत असल्याचे दिसून येत आहे. बोदवड शहरातील नागरिकांनी टॅंकरसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक यांच्यासोबत संपर्क साधावा, असे आवाहन रोहिणीताई खडसे यांनी केले आहे