जळगाव (प्रतिनिधी) आम्ही बंडखोर नाहीच, आम्ही शिवसेनेतच आहोत, पण नासक्या भाजीबद्दल काही बोलणार नाही, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. ते आज जळगावात पत्रकांसोबत बोलत होते.
बंडखोरांनी काय ते एक कारण सांगावं, असा टोला संजय राऊत यांनी लगावला होता. त्यावर गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. आमचा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याबद्दल विरोध नाही ते आम्हाला आदराचे आहेत. कोण माणूस शुक्राचार्य आहे तो तुम्हाला माहिती आहे, त्याने आमच्या पक्षाचा सत्यानाश केलाय, तो पक्ष आम्ही वाचवतोय, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
आमचा पक्ष वाढवण्यामध्ये आमचे लोक कमी पडले, तो पक्ष वाचवण्यासाठी आम्ही हा उठाव केला आहे. आम्ही बंडखोर नाहीच, आम्ही शिवसेनेतच आहोत. उलट आम्ही शिवसेना वाचवतोय, त्यासाठी आम्ही मंत्रिपदे सोडली, कुणी मायचा लाल ग्रामपंचायतचं सरपंचपद सोडत नाही, असंही गुलाबराव पाटील यांनी ठणकावून सांगितलं.
















