चाळीसगाव (प्रतिनिधी) अमित शाह यांच्या कार्यालयाबाहेर एकनाथराव खडसे आणि रक्षाताई खडसे बसल्याची माहिती मला मिळाली. मला अमित शाहांच्या कार्यालयाबाहेरून एक फोन आला होता. यानंतर मी रक्षाताईंना फोन करून याबाबत विचारलं. तेव्हा रक्षाताईंनीच मला सांगितलं की, आम्ही येथे जवळपास तीन तास बसलो. पण आम्हाला वेळ दिला नाही किंवा अमित शाहांनी भेटायला नकार दिला, असा दावा भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार एकनाथराव खडसे यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या स्नुषा खासदार रक्षाताई खडसे यांच्यासमवेत दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा होती. तेव्हापासूनच खडसे हे पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याच्या चर्चेनेही जोर धरला होता. मात्र, आता राज्यातील भाजपचे मंत्री आणि खडसे यांचे कट्टर विरोधक गिरीश महाजन यांनी एक वेगळाच दावा करत खळबळ उडवून दिली आहे.
गिरीश महाजन यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की, एकनाथराव खडसे आणि रक्षाताई खडसे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भेटण्यासाठी दिल्लीत गेले होते. मात्र, त्यांची भेट झाली नाही. मी रक्षाताईंना फोन केल्यानंतर त्यांनीच मला ही माहिती दिली. एकनाथराव खडसे आणि अमित शाहांच्या भेटीबाबत मी मिडीयातून ऐकलं. यानंतर मी थोडीशी अधिक माहिती घेतली. अमित शाह यांच्या कार्यालयाबाहेर एकनाथ खडसे आणि रक्षाताई खडसे बसल्याची माहिती मला मिळाली. मला अमित शाहांच्या कार्यालयाबाहेरून एक फोन देखील आला होता. यानंतर मी रक्षाताईंना फोन करून याबाबत विचारलं. तेव्हा रक्षाताईंनीच मला सांगितलं की, आम्ही येथे जवळपास तीन तास बसलो. पण आम्हाला वेळ दिला नाही किंवा अमित शाहांनी भेटायला नकार दिला. ते अमित शाहांना भेटायला गेले होते. मात्र, त्यांच्यात भेट झाली नाही, एवढं मला निश्चित कळालं आहे, असे गिरीश महाजन यांनी सांगितले. त्यामुळे आता विषयावर एकनाथराव खडसे नेमकी काय प्रतिक्रिया देतात?,हे पाहावे लागेल.
खडसे मला आणि फडणवीसांना म्हणाले, ‘आपण बसवून मिटवून टाकू’
शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांनी आपले पारंपारिक प्रतिस्पर्धी एकनाथ खडसे यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. नाशिकच्या सभेत एकनाथ खडसे यांनी फडणवीसांना आणि मला एक विषय मिटवून टाकू असं सांगितलं होतं. पण गर्दीत तो विषय कोणता? हे मात्र आम्हाला कळलं नाही, असं महाजन यांनी आज मीडियाशी बोलताना सांगितलं. नाशिकच्या महानुभाव पंथाचा तो कार्यक्रम होता. सभेतलं भाषण संपल्यावर एकनाथ खडसे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्याजवळ आले होते. मंत्रीमंडळ विस्तार बाकी असल्याने बसायचा विचार करु, असे खडसेंना म्हणाल्याचंही महाजनांनी सांगितलं. पण खडसेंना नेमका कोणता विषय मिटवायचा आहे, हे मला माहिती नाही, असंही सांगायला गिरीश महाजन विसरले नाहीत.
No Comment Sorry