त्रिची (वृत्तसंस्था) तामिळनाडू पोलिसांनी मौल्यवान पाचू रत्नाचे शिवलिंग जप्त केले आहे. तामिळनाडू पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागातील (सीआयडी) मूर्ती शाखेने (आयडॉल विंग) तंजावूर येथील एका व्यक्तीच्या बँक लॉकरमधून तब्बल ५०० कोटी रुपये किमतीचे पाचूचे शिवलिंग जप्त केले आहे. दरम्यान, हे शिवलिंग कुठून आले याचा शोध सध्या तामिळनाडू पोलीस घेत आहेत.
सीआयडीच्या मूर्ती शाखेचे एडीजीपी के. जयंती मुरली यांनी चेन्नईत पत्रकारांना ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, तंजावूर येथील अरुलानंद नगरातील लंगवल होम्स येथे पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे छापा मारला. एन. एस. अरुण याची चौकशी करण्यात आली. अरुण याने पोलिसांना सांगितले की, त्याचे ८० वर्षीय वडील एन. ए. सामियप्पन यांनी तंजावूर येथील एका बँक लॉकरमध्ये हे शिवलिंग ठेवले आहे. त्यानुसार पोलिसांनी सामियप्पन याची चौकशी केली. त्याने बैंक लॉकरमधून शिवलिंग काढून दिले. पोलिसांनी सांगितले की, एकाच पाचूमध्ये कोरण्यात आलेल्या या शिवलिंगाचे वजन ५३० ग्रॅम असून उंची ८ सें.मी. आहे. रत्नपारखींद्वारे त्याची शुद्धता तपासण्यात आली. त्यात शिवलिंग शुद्ध पाचूचे असल्याचे आढळून आले. त्याची बाजारभावानुसार किंमत ५०० कोटी रुपये आहे.
मंदिरातून चोरल्याची शंका
पोलिसांनी सांगितले की, हे शिवलिंग दक्षिण भारतातील एखाद्या मंदिरातून चोरलेले असू शकते. ते कोणत्या मंदिराशी संबंधित आहे. याचा शोध वैज्ञानिक तपासणीच्या माध्यमातून घेतला जाईल. २०१६ मध्ये नागपट्टणम जिल्ह्यातील थिरुकुवलाई येथील शिवमंदिरातून एक पाचूचे शिवलिंग चोरीला गेले होते. ते हेच आहे का, हेही पडताळून पाहिले जात आहे.