चाळीसगाव : प्रतिनिधी
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना फॉक्सकॉन वेदांता हा प्रकल्प राज्यात यावा म्हणून सर्वतोपरी प्रयत्न झाले होते. मात्र हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरात राज्यात गेल्यामुळे मोठी गुंतवणूक राज्यातून गेली, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका केली आहे. अजित पवार हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. चाळीसगावात असताना ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी अजित पवार पुढे म्हणाले की, या प्रकल्पासाठी कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांचा सुरुवातीला विचार करण्यात आलेला होता. आमचा कोणत्याही राज्याला विरोध नाही, पण आमच्या राज्यातील प्रकल्प कोणाच्या तरी दुर्लक्षामुळे बाहेर जात असेल तर ते महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. आम्ही ही बाब मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिलेली आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रातच राहावा म्हणून मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला जावं, प्रयत्न करावेत. मुख्यमंत्र्यांचे मोदींशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांनी हा प्रकल्प राज्यातच रहावा म्हणून पाठपुरावा केला पाहिजे. हा प्रकल्प महाराष्ट्रात होत असताना त्यावेळी आमच्या सरकारने प्रकल्पाला विविध सवलती देण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शवली होती. या प्रकल्पासाठी तळेगाव येथील जमीन देखील निश्चित करण्यात आलेली होती, असे अजित पवार म्हणाले.