गंगापूर (वृत्तसंस्था) वैजापूरकडून गंगापूरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जात असलेल्या युवकांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. यात दोघांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला आहे. विशाल रावसाहेब हिवाळे (२४, रा. हातवन ), राजेश प्रताप पटेकर (२३, मोतीगव्हाण) अशी मृताची नावे आहे.
मूळ जालना जिल्ह्यातील रहिवासी व सध्या छत्रपती संभाजीनगर शहरात वास्तव्यास असलेले राजेश प्रताप पटेकर, विशाल रावसाहेब हिवाळे, ज्ञानेश्वर सातपुते हे तीन तरुण मंगळवारी पहाटे तीन वाजता दुचाकीवर छत्रपती संभाजीनगरहून गंगापूर मार्गे वैजापूरकडे जात असताना वैजापूरहून गंगापूरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला एका पेट्रोल पंपासमोर जोराची धडक दिली. हा अपघात गंगापूर – वैजापूर मार्गावर मंगळवारी (दि. ४) पहाटे साडेतीन वाजता घडला.
या अपघातात विशाल आणि राजेशचा जागीच मृत्यू झाला. जखमी ज्ञानेश्वर सातपुतेवर उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी घाटी पाठविण्यात आले. रुग्णालयात याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, मंगळवारी सकाळी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावणारा होता.