मुंबई (वृत्तसंस्था) देशाच्या नवे संसद भवन आता लवकरच उभे राहणार आहे. सुमारे १००० कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून मोदींवर निशाणा साधला आहे. अधिवेशने, चर्चा होणारच नसतील तर १००० कोटी खर्च करून नव्या संसद भवनाचा घाट आणि थाट कशासाठी?, अस सवाल सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.
‘भारताची संसद सध्या बंद पडली आहे. संसदेत काम नाही, पण १००० कोटींचे नवे संसद भवन न्यायालयाचा आदेश डावलून उभारले जात आहे. देशात रशियासारखी स्थिती निर्माण झाल्याचे पृथ्वीराज चव्हाणांसारखे नेते सांगतात. पुतिन यांनी सर्वसत्ताधीश होण्यासाठी कायदेच बदलले. संसदेचे महत्त्व कमी केले. विरोधकांना खतम केले. ब्रिटनमध्ये असे कधीच घडणार नाही, का? असा सवाल करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी केली आहे. ‘आपल्या देशात लोकशाही धोक्यात असल्याची ओरड सदा सर्वकाळ सुरूच असते. पंडित नेहरूंपासून ते आजच्या मोदींपर्यंत. तरीही लोकशाही धोक्यात नसून लोकशाहीचे अजीर्णच झाले आहे असेही अनेकांना वाटते. त्या अनेकांतले एक प्रमुख म्हणजे नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत. श्री. कांत यांनी या आपल्या देशात ‘टू मच’ म्हणजे अती लोकशाही असल्यामुळे आर्थिक सुधारणा कठीण होऊन जात असल्याचे म्हटले आहे. महात्मा गांधींवर आणि पंडित नेहरूंवर एकाधिकारशाहीचे आरोप झाले, तसे आरोप आता मोदींवर होत आहेत. अमेरिकेतील लोकशाहीचे नेहमी कौतुक होते. त्या अमेरिकेतही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पराभूत झालेले प्रे. ट्रम्प पराभव मानायला तयार नव्हते व सत्ता सोडणार नाही अशी त्यांची पोरकट भूमिका होती. पण आता ते जात आहेत. अमेरिकेत हे असे लोकशाहीचे अजीर्ण झाले तेथे हिंदुस्थानसारख्या देशाचे काय? असा सवाल राऊत यांनी विचारला आहे.
दरम्यान, सध्याचे संसद भवन आणखी किमान 50-75 वर्षे सहज चालले असते. ते काही ठिकाणी गळते, ही तक्रार सोडली तर त्या लोकशाही मंदिराचे बांधकाम मजबूत असल्याचं राऊत म्हणाले.