पाळधी खु. धरणगाव (प्रतिनिधी) पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने पाळधी खुर्द येथील कन्याशाळेची विद्यार्थिनी कु. मेघना अरुण माळी ही जीबीएस या महादुर्धर आजारातून मुक्त झाली आहे.
पाळधी खु. येथील कन्याशाळेची विद्यार्थिनी कु मेघना अरुण माळी हिला गुलियन बेरी सिंड्रोम (जीबीएस) हा आजार अज्ञात व्हायरसने ग्रासले आहे. हा आजार शरीरात घुसून थेट रक्तवाहिनी, स्नायूवर हल्ला करत असल्याने हातापायातील ताकद जाऊन अंग लुळे पडण्याची लक्षणे आढळले आहेत. योग्य औषधोपचाराने हा रोग काबूत येत असला तरी खर्चिक उपचारामुळे रुग्णांचे नातेवाईक मेटाकुटीस येत आहेत. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना याबाबत माहिती मिळताच नाशिक येथे शासकीय दौरा असताना त्यांनी वसंत पवार हॉस्पिटलमध्ये जाऊन कु. मेघना माळी व तिच्या आईवडिलांची भेट घेतली व सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले होते.
या रोगाचे निदान वेगाने होण्याची गरज असते. मेंदूचे स्कॅनिंग झाल्यावर संबंधित व्यक्तीला लकवा नसल्याचे निदान होते. त्यानंतर रक्त तपासणी, नसांचे स्कॅनिंग, कमरेतील पाण्याचे रिपोर्ट घेऊन जीबीएसचे निदान झाल्यानंतर ताबडतोब उपचार सुरु केले जातात. इंजेक्शनऐवजी प्लाझ्मा सेरेसिसद्वारे उपचार केले जातात. या उपचार पद्धतीत रुग्णावर डायलेसिससचे चार ते पाच वेळा उपचार करुन रक्तात मिसळलेला व्हायरस काढून टाकला जातो. योग्य वेळी मिळालेल्या औषधोपचाराने कु मेघना बरी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी केलेल्या अनमोल सहकार्यामुळे आणि त्यांनी दिलेल्या प्रत्यक्ष भेटीमुळे विद्यार्थिनी या आजारातून बरी झाली, असे मत मुलीचे वडील अरुण माळी यांनी व्यक्त केले.